Latest Marathi News | शहरातील शाळा बंद पडण्याची वेळ; बोगस मतदार नोंदणीमुळे अडथळा

नाशिक : आधारकार्ड मतदार कार्डाला जोडण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या मोहिमेसाठी शहरातील खासगी व महापालिकेच्या शाळांमधील ८० टक्के शिक्षक या कामासाठी लावल्याने शिक्षकांचे शैक्षणिक कार्य बंद होऊन शाळा बंद पडण्याची वेळ आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शाळा सुरू होण्यापूर्वी किंवा शाळा संपल्यानंतर कामे करा, असे फर्मान सोडल्याने शासनाच्या आदेशातील इच्छुक हा शब्द वगळण्याची मागणी शिक्षकांकडून होत आहे. (shut down time for schools in city Obstructed by bogus voter registration Nashik Latest Marathi News)

बोगस मतदार बाजूला करून निष्पक्ष वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने राज्य शासनाने आधारकार्ड मतदार कार्डाला लिंक करण्याची मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या. सूचनेनुसार राज्य शासनाने शहरी भागात महापालिकांना या कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कर्मचारी वर्ग करण्याच्या सूचना दिल्या.

राज्य शासनाने कर्मचारी वर्ग करताना सूचनापत्रात कामाचे स्वरूप इच्छुक असल्याची नोंद केली. मात्र, सदर काम इच्छुक असले तरी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून बळजबरी करण्यात आल्याचा आरोप शिक्षकांकडून होत आहे. आधारकार्ड मतदार कार्ड लिंक करण्यासाठी महापालिकेच्या घर व पाणीपट्टी वसुली विभागातील जवळपास १३५ कर्मचारी वर्ग करण्यात आले. परिणामी गेल्या १० ते १२ दिवसांपासून वसुली रखडले आहे.

त्याचबरोबर महापालिकेच्या शाळांमधील ७० शिक्षक या कामासाठी वर्ग करण्यात आले आहे. ज्या शाळांमध्ये १० शिक्षक आहे. त्या शाळांमधील सात शिक्षक निवडणुकीच्या कामासाठी वर्ग करण्यात आल्याने, त्या शाळांमधील शिक्षण पूर्णपणे थांबले आहे. खासगी शाळांमध्येदेखील अशीच परिस्थिती आहे. कोरोनामुळे दोन वर्ष शाळा बंद होत्या. नियमित शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली. त्यामुळे विस्कटलेली घडी सरळ करताना अनेक अडचणी येत असताना त्यात आता निवडणुकीचे कामकाज आले.

हेही वाचा: Sakal Exclusive : वन्यजीव अवयव विक्रीचे नाशिक बनले केंद्र; 8 महिन्यात 6 घटना

शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण शैक्षणिक कार्य करता येत नाही व दुसरीकडे आधार व मतदार कार्ड लिंक करताना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून बळजबरी होत असल्याने कामाचा ताण निर्माण झाला आहे. शासनाच्या सूचना पत्रात ऐच्छिक शब्द असताना बळजबरीने काम करून घेतले असल्याने शिक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.

सिडकोत बोगस मतदार

पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये आधारकार्ड मतदार कार्डला लिंक करताना मतदारांकडून आधार कार्डाची मागणी केली जाते. मात्र, अनेक मतदारांचे सिडको पश्चिम व कसमादे भागातदेखील मतदार याद्यांमध्ये नाव आहे. त्यामुळे मतदार मागणी केलेली कागदपत्रे देत नसल्याचा अनुभव आहे मात्र, दुसरीकडे काम पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दबाव वाढत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे असून, बोगस मतदार वगळण्याची मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा: ग्रामीण भागात पुन्हा ‘चुली’वर स्वयंपाक; का ते जाणुन घ्या...